विशेष प्रतिनिधी
बीड : बीड प्रकरणात ज्याने खंडणी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सर्वांची चौकशी करून त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावले पाहिजे. सर्वांचे सीडीआर बाहेर आले पाहिजेत,महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज बीड येथे जाऊन भेट घेतली. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिच्याशी संवाद साधून तिला आधार दिला.
सुळे म्हणाल्या की मी आश्वासन देण्यासाठी नाही, तर आधार साथ देण्यासाठी इथे आले आहे. माणुसकीच्या नात्याने आम्ही या कुटुंबात सोबत उभे आहोत. महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तरी याच ताकदीने त्यांच्याबरोबर आम्ही उभे राहू. या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे निष्पक्ष पातळीवर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुळे यांनी केली
सुळे म्हणाल्या की सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टाद्वारे झाली पाहिजे. फरार असलेले कृष्णा आंधळे सापडलेच पाहिजेत.माणूस असा कसा गायब होऊ शकतो असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन दिल्लीत सत्कार केला यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला याच्यातले काही माहिती नाही. आपण देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी कालच विनंती केली आहे. वेळ मिळाली की त्यांच्याशी बोलेल असेही त्या म्हणाल्या.