Nana Patole : गोंदिया जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांच्यात शाब्दिक चकमक

विशेष प्रतिनिधी

गोंदिया : Nana Patole गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी तापली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी होत आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी बँकेच्या व्यवस्थापनावर भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रवादीने ही संस्था गेल्या १३ वर्षांत पोखरून काढल्याचे आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल पटेल यांनी नाना पटोलेंना ‘रिकामटेकडे चिल्लर नेते’ अशा शब्दांत लक्ष्य केले.Nana Patole

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, “गेल्या १३ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने गोंदिया जिल्हा बँकेला पोखरून काढले असून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.” त्यांच्या या आरोपाचा समाचार घेत प्रफुल पटेल यांनी थेट नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, “नाना पटोले सारखे लोक आता रिकामे झाले आहेत. पूर्वी राज्याचे नेतृत्व करायला निघाले होते, मग विदर्भाचे… आणि आता जिल्ह्याचेही नेते राहिले नाहीत. अशा चिल्लर नेत्यांकडूनच अशा विधानांची अपेक्षा करता येते.”

प्रफुल पटेल यांच्या या टीकेनंतर नाना पटोले यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांच्यावर अनेक गंभीर आरोप करताना म्हटलं की, “मी तुमच्याशी मोठा भाऊ म्हणून वागतो, त्यामुळे तुम्हीही आदराने वागायला हवे. अन्यथा कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे मला चांगले माहीत आहे.” यासोबतच त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर राजकीय साटेलोट्याचा आणि बँकेच्या विक्रीचा कट रचल्याचा आरोपही केला.

पटोले म्हणाले की, “मी एक शेतकरी आहे. जर शेतकरी चिल्लर असेल, तर शेतकऱ्यांकडून मत मागायचा अधिकार तुम्हाला कुठून मिळतो? शेतकरी दिवसरात्र कष्ट करतो, म्हणून तुम्हाला दोन वेळा जेवायला मिळतं. जे ईमानदार असतात, त्यांना चिल्लर म्हणणं ही खालची पातळी आहे.”

पटोले म्हणाले , अहमदाबादमधील विमान अपघात होण्यास कारणीभूत कोण आहे? अहमदाबादमध्ये क्रॅश झालेलं विमान कोणाच्या कार्यकाळात घेतलं होतं हे सांगा. टाटांचे सीईओ त्या दुर्घटनेवर फक्त तीन मिनिटं बोलले, पण तुम्ही मीडियासमोर तीस-तीस मिनिटं भाषणं देत बसलात —का? फक्त दोष आपल्यावर येऊ नये म्हणून?”

नाना पटोले प्रफुल पटेल यांच्यावर भाजपसोबत साटेलोट्याचा आरोप करताना म्हणाले”ज्या काँग्रेसने तुम्हाला मोठं केलं, तीच काँग्रेस सोडून तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी भाजपच्या कुशीत गेलात. माझ्याविरोधात बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की मला संजय राऊतांपेक्षा अधिक बोलता येतं.”

पटोले यांनी दावा केला की, “या निवडणुकीत एका मतदारासाठी १० लाख रुपये देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यांना बँक विकायची आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत.”

Verbal clash between Nana Patole and Praful Patel on the occasion of Gondia District Bank elections

महत्वाच्या बातम्या