नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ घालण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू होत असतानाच भाजपने आधीच आपली उमेदवार निश्चित केले. भाजपकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार असणार असल्याचे नावही वडेट्टीवार यांनी जाहीर केले. Vijay Vadettiwar

विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे आरक्षण फिक्सिंग आहे, असे मी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. नागपुरात महापौर पदाचा उमेदवार आधीच ठरवण्यात आला असून आज मी त्यांचे नाव जाहीर करतो. शिवानी दानी या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असतील,असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.



आरक्षण प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले. आरक्षणावर शिवसेनेने घेतलेले आक्षेप पूर्णपणे योग्य आहेत. गरज भासल्यास हे प्रकरण न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. नागपुरातील महापौर पदाच्या निवडीवरून आता राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नागपूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. एकूण 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत 102 जागांवर विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष ठरला.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. या सोडतीनंतर अनेक महापालिकांमधील आरक्षण स्पष्ट झालं असलं, तरी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबईच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. ही सोडत ठरावीक राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

Vijay Vadettiwar alleges irregularities in reservation for the post of mayor in Nagpur

महत्वाच्या बातम्या