विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात संपूर्णपणे विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नसून महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ त्यासाठी निश्चितच सहाय्यकारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला सल्लागार समितीने मान्यता दिली. हा मसुदा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. या मसुद्यात 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा तीन टप्प्यातील विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठण्याचा ‘रोडमॅप’ दिला आहे.
विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा ऐतिहासिक दस्ताऐवज असून भविष्यात कुठलीही योजना, धोरणे बनविताना या मसुद्याचा उपयोग झाला पाहिजे. हे ‘डॉक्युमेंट’ महाराष्ट्राला राज्यांसोबत नाही, तर जगासोबत स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल. या संपूर्ण मसुद्याचे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यात यावे. ज्यातून नागरिकांना सुलभ पद्धतीने तो समजून घेता येईल, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी. प्रस्तावात उणिवा असल्यास आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा, यातून वेळेची फार मोठी बचत होईल, अशी ही यंत्रणा असावी. कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेल्या कामाची केवळ अचूकता तपासण्याची कार्यवाही विभागास करावी लागेल. प्राधान्याने नगर विकास, महसूल विभागाने गतीने ही कार्यवाही पूर्ण करावी. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रभावी काम करण्यासाठी एलएलएम (लार्ज लैंग्वेज मॉडेल) तयार करावे.
उद्योग विभागाने भागीदारीतून विविध योजनांच्या लाभार्थी माहितीसाठी ‘क्लाऊड कम्प्युटिंग’ वर आधारित व्यवस्था उभारावी. त्याचा उपयोग सर्व यंत्रणांना होईल. राज्याला पुढे नेत असताना भविष्यात कुठलीही अडचण न येणारे शाश्वत विकासाचेच मॉडेल निर्माण करावे, असे आदेशही फडणवीस यांनी बैठकीत दिले. तसेच हा मसुदा बनविण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सूचनांबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त करीत नागरिक राज्याच्या विकासाप्रती किती सजग आहे, हे यावरून दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Vision document will realize the dream of a developed India: Chief Minister confident
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा