Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली

विशेष प्रतिनिधी

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची (Walmik Karad) बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. कराडला मधुमेह आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तब्येतीत अधिक बिघाड झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे.



माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मीक कराड (Walmik Karad) ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव निर्माण झाला होता. अखेरीस त्यांनी प्रकृती कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, वाल्मीक कराडला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणाचे वकीलपत्र प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

वाल्मीक कराडला बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केला आहे. कासले यांनी सांगितले की, कराडसाठी तुरुंगात विशेष सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याला झोपण्यासाठी अतिरिक्त पांघरूण दिले जाते, चहा पिण्यासाठी वेगळा कप वापरतो, तसेच इतर कैद्यांच्या नावावर तो रेशन घेतो. कराडवर खरोखर कारवाई करायची असेल, तर त्याची तात्काळ दुसऱ्या तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी कासले यांनी केली आहे.

24 जून रोजी पुढील सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात 17 जून रोजी होणार होती. मात्र, न्यायाधीश रजेवर गेल्यामुळे ती सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील तारीख 24 जून निश्चित केली आहे. आता अवघ्या दोन दिवसांनंतर, मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Walmik Karad, accused in Sarpanch Santosh Deshmukh murder case, condition deteriorates in Beed jail

महत्वाच्या बातम्या