MNS Triggers : मनसे सोबत युतीने ठाकरे गटात बंडाची लाट, ‘मातोश्री’ बाहेर घोषणाबाजी

विशेष प्रतिनिधी

मुंबई: MNS Triggers नऊ वर्षांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये अभूतपूर्व बंडखोरी उफाळून आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी लालबाग, दादर, वरळी, परळ या भागांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनीच अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाचा झेंडा उभारला. संतप्त कार्यकर्त्यांचे आंदोलन थेट मातोश्रीबाहेर पोहोचले.MNS Triggers

प्रस्थापितांना पुन्हा संधी, कार्यकर्त्यांत नाराजी

निवडणूक जाहीर होताच इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली होती. मात्र अनेक प्रभागांत पुन्हा-पुन्हा प्रस्थापित नेते, कुटुंबीय किंवा माजी पदाधिकाऱ्यांनाच संधी दिल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. त्यातच काही जागा मनसेला देण्यात आल्याने “निष्ठावंत कॅडरला डावलले जात आहे” असा आरोप करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले.MNS Triggers



परळमधून ठिणगी, मातोश्रीपर्यंत आग

परळ (प्रभाग २०२) येथे वादाला तोंड फुटले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीवरून शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक पातळीवरील बैठकीनंतर आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा इंदुलकर यांनी केला होता. मात्र अर्जाच्या दिवशी मातोश्रीतील भेटीनंतर श्रद्धा जाधव यांनाच उमेदवारी मिळाल्याचे स्पष्ट होताच संतप्त शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली.

यावेळी विजय इंदुलकर, माजी नगरसेवक नंदू विचारे आणि मनसेचे अजित मुगणेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून थेट बंडखोरी केली.

वरळीत स्वतंत्र उमेदवारी, दादरमध्ये पक्षांतर

वरळीत माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या उमेदवारीविरोधात शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
दादर-शिवाजी पार्क परिसरात जागा मनसेला दिल्याने माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आणि तात्काळ उमेदवारीही मिळवली. त्यामुळे येथील लढत अधिक रंगतदार झाली आहे.

परळगावात थेट गळती

परळगावमध्ये माजी नगरसेवक व माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांना डावलून शाखाप्रमुख किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी टोकाला पोहोचली. या निर्णयामागे विधानसभा समन्वयक सुधीर साळवी यांची भूमिका असल्याची चर्चा आहे. नाराज कोकीळ यांनी लगेचच शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली.

मातोश्री परिसरही वाचला नाही

प्रभाग ९५ मध्ये आमदार वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच झाली. अखेर सरदेसाई समर्थित हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे पक्षांतर्गत पक्षपातीपणाच्या आरोपांना पुन्हा उधाण आले.

अपक्ष उमेदवार, उघड आंदोलन, पक्षांतर आणि मातोश्रीबाहेरील घोषणाबाजीमुळे ठाकरे गटासमोर मोठी शिस्तीची कसोटी उभी राहिली आहे. जी निवडणूक पुनरागमनाची संधी मानली जात होती, ती आता अंतर्गत बंडखोरीच्या सावलीत गेली आहे. आगामी दिवसांत बंड शमते की आणखी वाढते, यावरच मुंबईच्या राजकीय गणितांचे भवितव्य ठरणार आहे.

Alliance With MNS Triggers Revolt in Thackeray Camp, Protests Outside Matoshree

महत्वाच्या बातम्या