विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून शुक्रवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत असलेली १०० उमेदवारांची पहिली यादी अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाने यादी जाहीर करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवत ती रविवार (दि.२८) संध्याकाळी जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पक्षातील हालचालींना वेग आला आहे. BJP postpones
भाजपने यादी जाहीर न करण्यामागे केवळ अंतर्गत असंतोष नव्हे, तर मित्रपक्ष शिवसेनेसोबत सुरू असलेला जागावाटपाचा तिढाही महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेनेकडून अपेक्षेपेक्षा कमी जागांची ऑफर दिली जात असल्याच्या आरोपामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही. युती कायम राहणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाणार, याबाबत संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भाजपच्या संभाव्य उमेदवार यादीबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. पक्षातील पदाधिकारी, आमदारांच्या मुलासह त्यांच्या नातेवाइकाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांच्यासह इतर प्रभावी गटांतील साधारण ६० ते ७० जागांवर जवळपास अंतिम मान्यता मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र उर्वरित ३० ते ४० जागांवर काही प्रभागांमध्ये तीव्र वाद होण्याची शक्यता आहे. या जागांवर अनेक इच्छुक उमेदवार दावेदारी करत असून, त्यातून अंतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
विशेष म्हणजे, यावेळी अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ज्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, ते पक्षातून बाहेर पडून अपक्ष म्हणून किंवा विरोधी पक्षाच्या माध्यमातून बंडखोरी करू शकतात, अशी भीती पक्षनेतृत्वाला सतावत आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन यादी जाहीर करण्याचा निर्णय काळजीपूर्वक घेतला जात असल्याचे सांगण्यात येते.
यादी शनिवारी जाहीर झाली असती, तर नाराज उमेदवारांना बंडखोरीसाठी अधिक वेळ मिळाला असता. त्यामुळे रविवारी यादी जाहीर करून त्यानंतर केवळ एक-दोन दिवसच शिल्लक ठेवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. यामुळे बंडखोरीला आळा घालता येईल, असा पक्षाचा अंदाज आहे. यामुळेच यादी जाहीर करण्याबाबत भाजपने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते.
भाजपकडून १०० जागांवरील उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी यादी जाहीर झाल्यानंतर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत. भाजपच्या यादीनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवार याद्याही जाहीर होणार असल्याने त्या पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्येही उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांत सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
BJP postpones list of 100 candidates; announcement on Sunday due to fear of rebellion
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल