ठाण्यात भाजपच्या उमेदवार यादीवरून गोंधळ; नाराज इच्छुकांकडून कार्यालयात तोडफोड

विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यात भाजपने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी रात्री उशिरा जाहीर केल्यानंतर पक्षात तीव्र असंतोष उफाळून आला. यादीत नाव नसलेल्या इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी वर्तक नगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात पहाटेपर्यंत गर्दी करत जोरदार आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयात तोडफोड केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. BJP Ticket

प्रभाग क्रमांक १५ मधील नाराज इच्छुकांनी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्या. इंदिरानगर आणि रुपादेवी पाडा परिसरातील विद्यमान भाजप नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराजी अधिक तीव्र झाली. घोडबंदर रोड परिसरातील काही प्रभागांमध्येही इच्छुकांचे तिकीट कापल्याने असंतोष वाढल्याचे दिसून आले.

वर्तक नगर कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेला काही प्रभाग सोडल्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील काही केबिनचे दरवाजे बंद केले तसेच अधिकृत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना कोंडून ठेवण्याचाही प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

कार्यकर्ते अधिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी मंगळवारी सकाळपर्यंतही कार्यालयात नाराज इच्छुकांची गर्दी कायम होती. उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आल्याने पक्ष नेतृत्वापुढे नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

BJP Ticket List Sparks Uproar in Thane; Angry Aspirants Vandalise Party Office

महत्वाच्या बातम्या