Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत अजित पवारांविषयी नाराजी आली उफाळून

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील वाद संपण्यास तयार नाही. रायगड जिल्हा पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांवर थेट आराेप करत आहेत. शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत तर ही नाराजी उफाळून आली. अजित पवारांवर थेट आराेप करण्यात आले.Ajit Pawar

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याशी वन टू वन संवाद साधत त्यांच्या खात्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या संवादादरम्यान अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिंदे गटातील बहुतांश मंत्र्यांमध्ये अजित पवारांबाबत असलेली नाराजी या बैठकीतून स्पष्ट झाली.

या बैठकीत काही मंत्र्यांनी थेट तक्रार करत सांगितले की, “अजित पवार आमच्या खात्यांच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत.” राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या चर्चेत मंत्र्यांनी म्हटले की, “जर अर्थमंत्री आमच्या खात्यांना निधीच देत नसतील, तर आम्ही काम कसे करणार?” मंत्र्यांनी सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, अशी मागणी केली आणि अजित पवार यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

या तक्रारींवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले की, “मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढेन.”

दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यापूर्वीही आपल्या खात्याच्या निधीविषयी अजित पवारांवर कठोर टीका केली होती. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याच्या ७४६ कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला, ही कृती बेकायदा आणि अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
ते म्हणाले होते की, “शिष्यवृत्ती आणि वसतिगृहासाठी दिलेला निधी जर दुसऱ्या योजनेसाठी वळवायचा असेल, तर मग हे खातेच बंद करा. आधीही माझ्या खात्यातून कोणतीही पूर्वकल्पना न देता ७ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते.” त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्थखात्याचा सध्या एकपक्षीय कारभार सुरू असून, इतर खात्यांच्या गरजा आणि गरिमेचा विचार केला जात नाही. ही बाब फक्त शिरसाट नव्हे तर इतर मंत्र्यांनाही खटकत असल्याचे आजच्या बैठकीतून दिसून आले.

बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना लोकोपयोगी कामांवर भर देण्याचा, प्रलंबित फायली वेळेवर मार्गी लावण्याचा आणि सामान्य जनतेपर्यंत कामे पोहोचवण्याचा सल्ला दिला. यासोबतच, निधीअभावी कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवरही चर्चा झाली.

In the Shiv Sena Shinde faction meeting, resentment against Ajit Pawar erupted

महत्वाच्या बातम्या