विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाने मुंबईत ठाकरे बंधूच्या युतीशी आघाडी केल्यानंतर काही वॉर्डातील उमेदवारांना तिकीट मिळणार नसल्याने मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी दोन दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. Rakhi Jadhav
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत पक्षाचा किल्ला एकहाती लढवणाऱ्या आणि मुंबई जिल्हा अध्यक्षा राखी जाधव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ 5 ते 10 जागा आल्याने जाधव या प्रचंड नाराज झाल्या होत्या. या नाराजीतूनच त्यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात संघटनात्मक बांधणी करण्यात राखी जाधव यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ठाकरे गटासोबतच्या युतीत पक्षाला अत्यंत कमी जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. मिळालेल्या माहितीनुसार, जागा कमी असल्याने पक्षातील इच्छुकांना थेट अजित पवार गटात जाऊन निवडणूक लढवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या. पक्ष कार्यालयातूनच तसे फोन गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आपल्याच कार्यकर्त्यांची दुसऱ्या पक्षात पाठवणी कशासाठी? असा सवाल करत राखी जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र निवडणूक लढत आहेत. महत्त्वाचे म्हणजे तिन्ही पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत लढत असल्याने काही वॉर्डात पाणी सोडावं लागणार असल्याने मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीतून लढल्या जाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.
पण आता ठाकरे बंधूंसोबत युती केल्यामुळे आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा मिळणे अपेक्षित आहे. आम्ही केवळ 15 ते 20 जागा मागत आहोत. कारण आमचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, ज्यांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या वॉर्डात पक्षसंघटना वाढवली आहे. त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, असाही आमचा प्रयत्न आहे. पण ठाकरे बंधूंच्या आघाडीत आम्हाला सन्मानजनक वागणूक नक्कीच मिळत असली तरी सन्मानजनक जागा मिळत नाही, अशी प्रतिक्रिया राखी जाधव यांनी दिली होती. यानंतर आता त्यांनी राखी जाधव यांनी भाजप आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी भाजपा पक्षात पक्षप्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद होते. मात्र नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागली होती. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट पडले. त्यावेळी राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळे राखी जाधव या मुंबई अध्यक्षपदी कायम राहिल्या. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसतानाही त्या गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची खिंड लढवत होत्या. मात्र आता वॉर्डातील इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
Major Setback for Sharad Pawar in Mumbai as City President Rakhi Jadhav Joins BJP
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत