विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने केंद्राला केवळ 1 लाख 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे कळवले आहे. याच आकडेवारीतील मोठ्या विसंगतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. Omraje Nimbalkar
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे कोणताही आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवलेला नाही, अशी माहिती कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी दिली. यावर ओमराजे निंबाळकर म्हणाले, आधी गृहमंत्रालयाने कृषी मंत्रालयाने लिहून दिलं की अजून प्रस्ताव आलेला नाही.
तुमच्या माध्यमातून बातम्या झाल्यानंतर कृषीमंत्री म्हणाले की राज्यकडून प्रस्ताव आलेला आहे. सर्वोच्च सभागृहात त्यांनी असे म्हटले आहे. हे खासदारांच्या विशेषाधिकारात येते, त्यामुळे लोकसभा अध्यक्षाकडे दाद मागणार आहे. मंत्री खोटे उत्तर देत असतील तर ते दुर्दैवी आहे. दुर्लक्ष झाले असेल तर कबूल करा ना. पण अशाप्रकारे राज्यातील सरकारला प्रोटेक्ट करत आहेत. आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याने असे रेकॉर्डवर खोटे उत्तर दिलेले पाहिले नाही. प्रस्ताव केंद्राकडे येत नाही तर डबल इंजिनचा काय उपयोग? असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला.
मुख्यमंत्री फोनवरुन सभा घेत होते, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून पळत पळत जात सभा घेत आहेत. मी माझे कर्तव्य पार पाडलेले आहे. उद्या किंवा परवा हक्कभंग दाखल करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. लोकसभेत दिले जाणारी उत्तरे खोटे ठरवली जाणार असेल तर दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले.
खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची परिस्थिती असल्याचे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली. डबल इंजिन सरकारचा काय उपयोग होतो आहे? तुळजापूरमध्ये ज्याने ड्रग्स आणले. त्याचे अकाउंट स्टेटमेंट आहेत. तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्रच्या नगराध्यक्ष पदाचा तिकीट भाजपने त्याला दिले. ज्याला अब्रू नाही त्याने अब्रुनुकसान दावा काय करावा, असेही ओमराजे म्हणाले.