निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला दिल्लीत अटक; व्हिडिओद्वारे केले होते गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी 

बीड : बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांना दिल्ली येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

रणजित कासले यांनी व्हिडिओत दावा केला होता की, त्यांना निवडणुकीदरम्यान ईव्हीएमपासून दूर ठेवण्यासाठी वाल्मीक कराडच्या कंपनीकडून १० लाख रुपये देण्यात आले होते. तसेच कोविड काळात अजित पवार गटाच्या एका आमदाराची गाडी त्यांनी पकडली होती, ज्यामध्ये कोट्यवधींचे ड्रग्ज सापडले होते. हा आमदार सध्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री असल्याचा दावाही त्यांनी केला होता.



काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या कासले यांनी बीड कारागृहातील व्हीआयपी ट्रिटमेंटवरही बोट ठेवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, वाल्मीक कराडला तुरुंगात विशेष जेवण, चिकन, फरसाण, चांगल्या पोळ्या, ब्लँकेट्स आणि महिन्याला २५ हजार रुपयांची कँटीनमधील खरेदी मिळते. कराड तुरुंगात गादीसारखी व्यवस्था वापरत आहे, असा आरोप त्यांनी केला.

कासले यांनी असा दावाही केला की, धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला पाच वर्षांच्या आत तुरुंगातून बाहेर काढण्याची ग्वाही दिली आहे. कराड सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मकोका अंतर्गत अटकेत आहे. तरीही त्याची तुरुंगातील व्यवस्था खास आहे.

दरम्यान, अंबाजोगाईतील एका व्यावसायिकाकडून कासले यांनी ६ लाख रुपये उसने घेतल्याचा आरोप आहे. हे पैसे त्यांनी आईच्या उपचारासाठी घेतल्याचे सांगितले होते. मात्र वारंवार मागणी करूनही पैसे परत न केल्याने संबंधित व्यावसायिक सुधीर चौधरी यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

राजकीय आणि पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप करणाऱ्या रणजित कासले यांच्यावर पुन्हा एकदा कायदेशीर कारवाई होत असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Suspended police sub-inspector Ranjit Kasle arrested in Delhi; Serious allegations were made through video

महत्वाच्या बातम्या