विशेष प्रतिनिधी
मुंबई : Baba Adhav श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आढाव यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही अशी मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.Baba Adhav
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक चळवळींचा वारसा पुढे नेण्यासाठी अखंड आणि व्रतस्थपणे क्रीयाशील राहणाऱ्यांमध्ये बाबा आढाव अग्रभागी राहिले. व्यवसायाने डॉक्टर असूनही बाबांनी संपूर्ण आयुष्य असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी वेचले. कचरावेचकांपासून ते हमाल, रिक्षाचालक बांधकाम मजूर, घरेलु कामगार यांचे संघटन त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले. ‘हमाल पंचायत, रिक्षा पंचायतच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला संस्थात्मक असे रूप दिले. ‘एक गाव एक पाणवठा’ या त्यांच्या मोहिमेने सामाजिक समतेचा आगळा प्रयोग राबविला गेला. त्यांचा ‘कष्टाची भाकर’ हा उपक्रम सामाजिक क्षेत्रातील संवेदनशीलतेचे आगळे उदाहरण ठरले. आपल्या तत्वांशी ठाम, असणाऱ्या बाबांची विचार मांडण्याची शैली परखड होती. बाबा आढाव यांचे निधन अशा अनेक उपक्रम, सामाजिक चळवळींना, त्यातील कार्यकर्ते यांना पोरके करून गेले आहे. आम्ही या सर्वांच्या तसेच आढाव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. श्रमिक चळवळींचा आधारवड, ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना व्यक्तीश: तसेच तमाम महाराष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.Baba Adhav
समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
डॉ. बाबा आढाव यांचे पुणे शहरासाठी अत्यंत मोलाचे योगदान होते. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे.
असंघटित मजुरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा दिला. हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम कामगार, बाजार समित्यांमधील कामगार यांना संघटित करून या श्रमिकांच्या हक्कांसाठी बाबांनी लढा दिला. ‘माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ’ ही प्रणाली उभी राहण्यामागे त्यांचे निर्णायक नेतृत्व होते, अशा शब्दांत केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली
पुण्यातील असंघटित मजुरांना ओळखपत्र, वेतन संरचना, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते. पुण्याचा खासदार या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
The supporter of social movements, the ‘father’ of workers, has been lost, tributes paid to Baba Adhav
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध