Raj Thackeray : धोकादायक पूल असूनही प्रवेशबंदी का नाही? राज ठाकरे यांचा सरकारला सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त करत कठोर शब्दांत सवाल उपस्थित केले आहेत. “धोकादायक पूल असूनही तिथे संपूर्ण प्रवेशबंदी का लावली गेली नाही? तो पूल आधीच पाडून त्याऐवजी नव्याने सुरक्षित पूल का उभारला गेला नाही?” असा थेट सवाल करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.

राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिताना स्पष्टपणे म्हटले आहे की, “पावसाळा सुरु होताच अशा दुर्घटनांचे सत्र सुरु होते. पुलं पडणे, रस्त्यांवर खड्डे, पाणी तुंबणे या घटना नियमित होतात. पण यावर सरकार दरवेळी फक्त ‘बचावकार्य सुरु आहे’ आणि ‘सरकार बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे’ एवढेच सांगते. पण हा प्रसंग येतोच का, हे कुणी विचारत नाही.”

ठाकरेंनी पुढे म्हटले की, “राज्यात किती पूल धोकादायक स्थितीत आहेत, याची यादी पावसाळ्यापूर्वी तयार करून त्यांच्या दुरुस्त्या किंवा किमान प्रवेशबंदी का लावली जात नाही? केवळ दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि मंत्री ‘साइट व्हिजिट’ करताना का दिसतात? इतकी वर्ष सत्तेत असलेल्या पक्षांनी आपला प्रशासनावरचा अनुभव उपयोगात आणून अशा समस्या युद्धपातळीवर सोडवायला हव्या होत्या.”

राज ठाकरे यांनी याच वेळी नागरिकांनाही आवाहन केलं की, “उत्साहाच्या भरात आपण कधी-कधी धोका पत्करतो. पण कुटुंबासोबत अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. अर्थात यामुळे सरकारची जबाबदारी कमी होत नाही, पण नागरिकांनीही थोडं भान ठेवायला हवं.”

मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळील पूल कोसळून आतापर्यंत ४ मृतदेह सापडले असून काही पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एनडीआरएफ, पोलीस व अग्निशमन दलाचे पथक मदत व शोधकार्य करत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दुर्घटनेतील सर्व मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

“सत्तेचा अनुभव सांगणाऱ्यांनी तो अनुभव प्रशासनावर प्रभाव टाकण्यासाठी वापरायला हवा होता. जर तुम्हीच असमर्थ असाल, तर मग तुमचा सत्तेतील अनुभव राज्याला काय उपयोग?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. Raj Thackeray

Why is there no entry ban despite the dangerous bridge? Raj Thackeray questions the government