विशेष प्रतिनिधी
पुणे: Gadkari लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि भावनेशी जोडलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुणे-पंढरपूर मार्गावरील प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम, उखडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते आणि अपूर्ण कामे दिसून आल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदारांचे देयक तत्काळ रोखण्याचे आदेश दिले.Gadkari
“विकासाच्या नावाखाली वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सहन केला जाणार नाही,” अशा कठोर शब्दांत गडकरी यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.Gadkari
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा संदर्भ देत गडकरी यांनी कोणताही मोठा ताफा न घेता खासगी बसने पालखी महामार्गाची पाहणी केली. प्रशासनाकडून पुणे-पंढरपूर, तुकाराम महाराज पालखी मार्गावरील सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले.Gadkari
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-965G) हा वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र पाहणीदरम्यान रस्ते खचणे, डांबरीकरणाचे थर उखडणे, निचऱ्याची अपुरी व्यवस्था, तसेच नियोजित मानकांनुसार काम न झाल्याचे प्रकार उघड झाले. काही ठिकाणी पदचारी मार्गाचे काम अपूर्ण असून वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा सुविधाही अद्याप पूर्णत्वास गेलेल्या नाहीत.
कामाच्या गुणवत्तेबाबत नेहमीच कठोर भूमिका घेणाऱ्या गडकरी यांनी यावेळीही कोणतीही तडजोड न करता थेट कारवाईचे संकेत दिले. “काम दर्जेदार नसेल तर एक रुपयाचेही पेमेंट करू नका. आवश्यक असेल तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका,” असे निर्देश त्यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना दिले.
आषाढी वारी अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असताना, वारकऱ्यांसाठी राखीव पदचारी मार्ग , पुलांची कामे आणि काही सेवा रस्त्यांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सुमारे ४४१६ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात झालेली दिरंगाई आणि गुणवत्तेतील त्रुटींमुळे ‘वारी सुखाची की कष्टदायक?’ असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
गडकरी यांच्या या दौऱ्यामुळे प्रशासकीय अनागोंदी आणि कामकाजातील हलगर्जीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले गेले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून मांडले जात असले, तरी प्रत्यक्ष स्थिती पाहता ते वेळेत पूर्ण होणार का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पालखी महामार्गाच्या अनेक टप्प्यांवर अद्याप मोठ्या प्रमाणात काम बाकी असल्याचेही स्पष्ट झाले. काही ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे अपेक्षित असताना, त्यामध्ये अपेक्षित गती दिसून आली नसल्याची चर्चाही सुरू आहे.
Gadkari fumes over poor quality work, orders halt on contractors’ payments
महत्वाच्या बातम्या