विशेष प्रतिनिधी
पुणे:Nasarapur Case जिह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्यातील नवले पुलावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून महामार्ग रोखून धरला होता. तब्बल चार तास चाललेले हे आंदोलन आणि पोलिसांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले आणि महामार्ग मोकळा केला.Nasarapur Case
शुक्रवारी, १ मे रोजी नसरापूरमध्ये एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी, संतापलेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी ‘आरोपीला तात्काळ फाशी द्या’ अशी मागणी लावून धरली.Nasarapur Case
शनिवारी सायंकाळी पीडित चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून आंदोलकांनी कात्रज जवळील नवले पुलावर ठिय्या मांडला. ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला गेल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी मागणी केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कुटुंबाशी फोनवर चर्चा करावी आणि आरोपीला फाशी देण्याचे जाहीर करावे.
आंदोलनाची तीव्रता पाहता पुणे पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांची आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. सुमारे चार तास चर्चा आणि विनंत्या करूनही आंदोलक हटत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी रस्ता मोकळा केल्यावर रात्री १०:३० च्या सुमारास वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली.
आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत नेला. रात्री ११:३० च्या सुमारास मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या २८ तासानंतर तिला अखेरचा निरोप देण्यात आला. स्मशानभूमीतील ती भयाण शांतता आणि नातेवाईकांचा हृदयद्रावक टाहो पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला कठोर शासन व्हावे, अशी भावना आता संपूर्ण स्तरातून व्यक्त केली जात आहे.
Nasarapur Case: Police Clear Intense Protest at Navale Bridge; Little Girl Cremated Amidst Tears
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन