‘नोंदणी करा आणि गॅस मिळवा’; पुणेकरांना प्रशासनाचे आवाहन, पीएनजी जोडणीसाठी सुविधा तयार

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात नैसर्गिक वायूचा वापर वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, तब्बल ४ लाख ११ हजार घरांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्णत्वास आल्या आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना पारंपरिक एलपीजी सिलिंडरच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छ, सुरक्षित आणि सातत्यपूर्ण गॅसपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
महानगरातील वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता, पीएनजी प्रकल्पाला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. याअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये सुमारे २,३०० किलोमीटर लांबीचे पाइपलाइन जाळे उभारण्यात आले आहे. मुख्य वितरण केंद्रांपासून निवासी वसाहती, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक क्षेत्रांपर्यंत ही यंत्रणा पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पीएनजी जोडणीची सुविधा आता प्रत्यक्षात उपलब्ध झाली आहे.



विशेष म्हणजे, या सुविधेसाठी केवळ घरगुती ग्राहकांकडूनच नव्हे, तर व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि उद्योग क्षेत्राकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅन्टीन, बेकरी, हॉस्पिटल्स तसेच लघु-मध्यम उद्योगांनी पीएनजीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढणार असल्याचे सांगीतले जात आहे.

पीएनजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सतत उपलब्धता आणि सुरक्षितता. सिलिंडर संपण्याची चिंता, बुकिंगची प्रतीक्षा किंवा गॅस गळतीचा धोका तुलनेने कमी असल्याने अनेक कुटुंबांचा या सुविधेकडे कल वाढला आहे. पाइपलाइनद्वारे थेट घरापर्यंत गॅस पोहोचत असल्याने स्वयंपाकघरातील व्यवस्थापन अधिक सोपे आणि आधुनिक बनत आहे.
याशिवाय, जागतिक ऊर्जा बाजारातील चढ-उतार, एलपीजीच्या किंमतीतील वाढ आणि पुरवठ्यावरील अनिश्चितता पाहता, पीएनजी हा दीर्घकालीन आणि स्थिर पर्याय म्हणून पुढे येत आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना ‘नोंदणी करा आणि गॅस मिळवा’ या मोहिमेद्वारे जोडणी प्रक्रियेला गती देण्यात येत असून, ज्या भागांत पाइपलाइन पोहोचली आहे, त्या भागांतील रहिवाशांनी तत्काळ नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘Register and get gas’; Administration appeals to Pune residents, facilities ready for PNG connection

महत्वाच्या बातम्या