missing link : मिसिंक लिंकवर सेल्फी काढताय सावधान..! बोगदे व केबल स्टेड ब्रिजवर 24×7 सीसीटीव्ही नजर ; नियमभंग केल्यास मोठा दंड

विशेष प्रतिनिधी

पुणे : missing link यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, या नव्या मार्गावरील केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहनचालकांकडून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी वाहने थांबवली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असून अपघातांना आमंत्रण देणारी आहे, असे स्पष्ट करत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनचालकांना इशारा दिला आहे.missing link

द्रुतगती मार्गावर कोणत्याही परिस्थितीत वाहने थांबवण्यास परवानगी नसल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विशेषतः बोगदे आणि उंच पुलांवर अचानक थांबणाऱ्या वाहनांमुळे मागून येणाऱ्या वाहनांना अंदाज न आल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. त्यामुळे सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.missing link



दरम्यान, महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे या कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादाही निश्चित केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी 100 किमी, तर बस व इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे आणि दोन प्रमुख पुलांवर 24 तास सीसीटीव्ही यंत्रणेची नजर ठेवण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर तात्काळ कारवाई केली जाणार असून, सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी वाहन थांबवल्यास मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वाहनचालक आणि प्रवाशांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतुकीचे नियम पाळावेत, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणारे कृत्य टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Selfies on missing link, beware, 24×7 CCTV watch on tunnels and cable stayed bridge, heavy fines for violations

महत्वाच्या बातम्या