Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे. आता मनःशांती होईल, विपश्यनेवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

पुणे : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी योग्य पर्याय निवडला आहे. आता मनःशांती होईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याचे समजते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्रिपदाचा राजीनामा तसेच करुणा मुंडे अशा सगळ्या वादात धनंजय मुंडे गेले काही महीने अडकले होते. आता ते विपश्यना घेत आहेत.

पंकजा मुंडे यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे. याबाबतचा सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील. महिला आयोगाने दखल घेणे क्रमप्राप्त आहे. कुठलीही तक्रार असू देत महिला आयोगाने ती घेतली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई करायला हवी, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे. दर्शन घेतल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी कार्यक्रम राबावण्याचे ठरवले आहे. प्रत्येक राज्यात कार्यक्रम राबवले जात आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाला महत्त्व देण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. दगडूशेठ मंडल या पर्यावरण उपक्रमात सहभागी झाला आहे. तसेच प्लॅस्टिकचा वापर करू नका, असे आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Dhananjay Munde has chosen the right option. Now he will have peace of mind, Pankaja Munde reaction on Vipassana

महत्वाच्या बातम्या