महिला वैद्यकिय अधिकाऱ्याला मानसिक त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पुणे पालिकेत प्रवेश बंदी

विशेष प्रतिनिधी

पुणे : भाजपच्या पदाधिकार्‍याकडून महापालिकेच्या एका महिला वैद्यकिय अधिकार्‍याची गेल्या पाच महिन्यांपासून मानसिक त्रास देण्याचा प्रकारामुळे संबंधित महिला अधिकार्‍याने महिला आयोगाकडे तक्रारा केली. यानंतर महापालिकेने  भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी केल्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी परिपत्रक काढले आहेत.

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष  ओंकार दिलीप कदम याच्याकडून गेल्या पाच महिन्यांपासून पालिकेतील महिला वैद्यकीय अधिकार्‍याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात जमावाने जावून छायाचित्रीकरण करणे, कार्यालयाचा दरवाजा बंद करणे, धमकावणे असे प्रकार भाजप पदाधिकार्‍याकडून सुरू होते. याबाबत संबधित महिला अधिकार्‍याने महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

त्यानंतर संबधित अधिकार्‍याने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती. एवढ्यावर न थांबता न्याय मिळत नसल्याने भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपच्या नगरसेविका यांच्याकडेदेखील दाद मागितली होती. तरीदेखील भाजपने दखल घेतली नव्हती.दरम्यान, महापालिकेत १७ फेब्रुवारी २०२५ रोजी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील महिला आरोग्य अधिकार्‍यांवर, त्यांच्या कर्तव्य बजावणी दरम्यान पूर्व परवानगी न घेता महिला कर्मचारी यांचे व्हिडीओ चित्रीकरण करणे, दमदाटी करणे, अर्वाच्च भाषा वापरणे याशिवाय दालनाबाहेर जाण्यास मज्जाव करत त्यांचे कक्षात गोंधळ निर्माण करून जाणीवपूर्वक बदनामी करून त्यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, २०१३ अन्वये प्राप्त झाली आहे. ही घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असून अंतर्गत तक्रार समितीकडून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार अशा दंडेलशाहीला आळा घालणे आवश्यक असल्याबाबत नमूद केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका मुख्यालय तसेच पालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये पुढील आदेश होईपर्यंत ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यासह घटनेत सहभागी अज्ञात व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. कोणत्याही कारणांस्तव कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्र केल्यास, संबंधित सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्वरित प्रतिबंध करून त्वरीत स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे परिपत्रक महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहे.

 BJP office bearer banned from entering Pune Municipal Corporation for mentally harassing female medical officer

महत्वाच्या बातम्या