Bangladeshi : चार बांगलादेशी घुसखोरांना अटक पुण्यात अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम आश्रम रस्त्यावरील नॉटिंग हिल सोसायटीच्या मागे असणाऱ्या केईसी लेबर कॅम्प येथून शुक्रवारी (१३ जून) चार घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वपन निधुभूषण मंडल (वय ३९), मिथुनकुमार दिलीप मंडल (वय ३१), रनधिरकुमार मंडल (वय ३७) आणि दिलीप निमाई मंडल (वय ३८, सर्व रा.केईसी लेबर कॅम्प , मुळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार तानाजी चंद्रसेन सरडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परकीय नागरिक कायदा १९४६, पारपत्र अधिनियम १९६७, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरिक आदेश १९५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस आणि सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे युनिट कडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोंढवा पोलिसांच्या पथकाने केईसी लेबर कॅम्प येथे छापा टाकला. पोलिसांना तिथे चार बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडे चौकशी करून ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र मिळाले नाही. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर चौघांनी ते बांगलादेशी असल्याचे कबूल केले. तसेच मागील तीन ते चार महिन्यांपासून येथे राहत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान, पोलीस चौकशीत चौघेजण चार महिन्यांपूर्वी भारत बांगलादेश सीमेवरून घुसखोरी करून आले असल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाईल फोन तसेच चार सीम कार्ड जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करीत आहेत.

Four Bangladeshi infiltrators arrested in Pune

महत्वाच्या बातम्या