विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका गावातील कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेत सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलने शरद पवार यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला. 21 पैकी 20 जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झाला. यावरून संजय राऊत यांनी 500 कोटी रुपयांचे आमिष दाखवल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात हे ऐतिहासिक गोष्ट आहे. 500 कोटी रुपयांचे आमिष दाखवले. ते 500 कोटी अजित पवार आपल्या खिशातून देणार आहेत का? ते पैसे सरकारच्या तिजोरीतूनच जाणार आहेत. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहेत. त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत.
ठाकरे गटामध्ये भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, “भास्कर जाधव हे चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही. सुनील राऊतांना देखील स्थान मिळाले नाही. त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? ती पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी आमच्या कुटुंबाचे योगदान होते, पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतले नाही. आपण समजून घेतले पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले आणि ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे अनेक होते. त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा पक्षाने निर्णय घेतला आणि आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो,” असे ते म्हणाले. त्यांनी येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, असा सल्लाही संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांना दिला. Sanjay Raut