विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांना महापालिका तसेच राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला होता. नैसर्गिक हद्दी ओलांडून प्रभाग रचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर नागरिकांना सूचना व हरकती नोंदविल्या आहेत. त्यावर सुनावणी झाली असून ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असून सहा प्रभागांच्या नावात बदल, तर ८ ते १० बदल हद्दीचे होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याची स्पष्टता अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच होणार आहे. Pune Municipal Corporation
आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सुनावणी झाल्यानंतर त्यामध्ये १४ ते १५ बदल करण्यात आले असून, ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये बदल, तर ८ ते १० बदल हद्दींचे करण्यात येणार आहे. असे राजकीय नेते ठामपणे सांगू लागले आहेत. त्यामुळे खरंच प्रभागांमध्ये बदल होणार का, याकडे लक्ष लागले आहे. ही अंतिम प्रभाग रचना पुढील दोन दिवसांत महापालिकेकडे जाहीर करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेच्या प्रतीक्षेत असलेल्यांची उत्सुकता लवकरच संपणार आहे, त्यानंतर लगेचच आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक या वेळी ४ सदस्यांच्या प्रभागानुसार होणार असून, १६५ नगरसेवक असणार आहेत. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर वेळापत्रकानुसार, ४ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुमारे ६ हजार हरकती आल्या होत्या. या हरकतींवर १२ आणि १३ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात आली.
मात्र, सुनावणीसाठी प्रत्यक्षात ८२८ जणच उपस्थित राहिले. या सुनावणीत प्रामुख्याने नैसर्गिक हद्दी न पाळल्याने प्रभाग मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले, तसेच या मोडतोडीमुळे अनेक प्रभागांचे आरक्षण बदलणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेत या सुनावणीनंतर काय बदल केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेने हा आराखडा नगरविकास विभागास सादर केल्यानंतर आणि नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यामध्ये १४ ते १५ बदल केले गेले असून, प्रामुख्याने हद्दीचे बदल उपनगरांच्या प्रभागात केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे बदल खूप मोठे नसल्याचीही चर्चा आहे. प्रत्यक्षात प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच हे बदल समोर येणार आहेत.
प्रभाग रचनेसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत अंतिम आराखडा जाहीर केला जाणार आहे. हा आराखडा निवडणूक आयोगाकडून महापालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, २ ऑक्टोबरला शासकीय सुट्टी आहे. ३ ऑक्टोबरला शुक्रवार आहे. त्यानंतर लगेच ४ ऑक्टोबर शनिवार आणि ५ ऑक्टोबरला रविवारमुळे शासकीय कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे महापालिकेस ही प्रभाग रचना मिळाल्यानंतर ती जाहीर करताना त्यासोबत हद्दीची अधिसूचनाही जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे उद्या (बुधवारी) अथवा शुक्रवारी महापालिकेस ही प्रभाग रचना मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Pune Municipal Corporation, six names, and 8 to 10 boundaries
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















