आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मातीच होत राहणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

नागपूर: जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मातीच होत राहील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने देदीप्यमान विजय मिळवला.

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना दहा हजार रुपये वाटल्याने भाजपचा विजय झाल्याची टीका केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती. त्यांची सरकारे होती तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाही. आम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे?

विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्ष एकत्रित लढतो की स्वतंत्र लढत आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण कसे लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तिथे महायुती निवडून येईल यात शंका नाही.

शरद पवार बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते.

Unless they introspect, they will continue to be soiled, Devendra Fadnavis attacks the opposition

महत्वाच्या बातम्या