उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांना वाय प्लस सुरक्षा; गृह विभागाचा आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांना राज्य सरकारने वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश १७ जून रोजी जारी केल्याची माहिती समोर आली आहे. Uddhav Thackeray

राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी जारी केलेल्या आदेशानुसार यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय बंडू जाधव, उत्तर मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, हिंगोली-नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.



लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींनंतर या सहा खासदारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर गुप्तवार्ता विभागाच्या अहवालाच्या आधारे गृह विभागाने सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या निर्णयावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारकडून सार्वजनिक खर्चात काटकसर आणि व्हीआयपी सुरक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्यावर भर दिला जात असताना, खासदारांना वाढीव सुरक्षा देण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, गृह विभागाकडून या निर्णयामागील कारणांबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सुरक्षावाढीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात यावरून आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Y-plus security granted to six Uddhav Thackeray faction MP

 

महत्वाच्या बातम्या