Ramdas Athawale : आम्हाला जागांसाठी विनवण्या कराव्या लागतात, रामदास आठवले यांची खंत

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ramdas Athawale इतर पक्ष निवडणुका आल्या की सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात. पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनंती, विनवण्या कराव्या लागतात. आम्हीही या देशाच्या राजकारणात आहोत, आम्हालाही लढायचंय, पण आमच्या पक्षाला मिळणाऱ्या जागांची अवस्था दयनीय आहे, अशी खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली.



पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त करताना आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावी असा असे आम्हाला वाटते. पण युतीसाठी 8 ते 9 जागांवर आमचा दावा आहे. भाजपने त्यांची मागणी मान्य केली नाही तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबतही हात मिळवण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत आहे. या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र राज्यात महायुतीकडून भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे असे सांगून आठवले म्हणाले, महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या. मुंबई महापालिकेत 17 ते 18 तर पुणे महापालिकेत 20 जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या, विशेषतः आमची नैसर्गिक युती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे, असेही आठवले म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे.

पुणे महापालिकेसाठी वीस प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भारतीय जनता पक्षाकडे सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे, असे आठवले यांनी सांगितले.

दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.

“We Have to Beg for Seats”, Says Ramdas Athawale in Expressing Discontent

महत्वाच्या बातम्या