Shirur MLA Dnyaneshwar Katke : शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मर्सिडीजची धडक, चार वर्षांची बालिका फेकली गेल्याने गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने एका 4 वर्षीय मुलीला जाेरदार धडक देऊन उडवल्याने मुलगी गंभीर जखमी झाले असून, तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



रविवारी दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे – अहिल्यानगर महामार्गावर घडली. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (4) असे जखमी मुलीचे नाव आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके रविवारी दुपारी शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी पुण्याहून शिरूरच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात बोऱ्हाडे मळा येथील ह्युंदाई शोरूमच्या समोर शुभ्रा एकटीच महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. ती एका कारच्या आडून अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज (MH 12 NX 1391) समोर आली.

लहान मुलगी कारपुढे आल्याचे पाहून कटके यांच्या चालकाने जोरात गाडीचे ब्रेक दाबले. पण मुलगी व कारमध्ये फारसे अंतर नसल्यामुळे तथा कारचा वेग जास्त असल्यामुळे कारने शुभ्राला उडवले. त्यानंतर शुभ्रा एखाद्या चेंडूसारखी हवेत उडून काही फूट अंतरावर रस्त्यावर पडली. कारने एका बालिकेला धडक दिल्याचे पाहून आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी त्या मुलीच्या दिशेने धावले. त्यानंतर त्यांच्याच कारमधून मुलीला शिरूर स्थित लगतच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. पण प्रकृती गंभीर बनल्यामुळे तिला आता पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात शुभ्राच्या डोके व जबड्याला जबर मार लागला आहे. तिचे दातही पडले आहेत. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने 4 वर्षीय चिमुरडीला उडवल्याची बातमी संपूर्ण शिरूरमध्ये पसरली. पण त्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणी लपवाछपवी केल्याचा ठपका ठेवला जात आहे. आम्हाला या घटनेविषयी ना रुग्णालयातून खबर मिळाली ना कुणी तक्रार करण्यासाठी आले, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

Shirur MLA Dnyaneshwar Katke’s Mercedes hits , four-year-old girl seriously injured after being thrown

महत्वाच्या बातम्या