विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभव डाव्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभर, विशेषतः उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचार उसळला. या निवडणुकीत सत्ताधारी डावे आघाडीस मोठा धक्का बसला असून काँग्रेस आघाडीच्या यूडीएफने बहुतेक स्थानिक संस्था जिंकल्या आहेत. दुसरीकडे एनडीएनेही मोठी मजल मारत पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम महापालिका ताब्यात घेतली.
सर्वात धक्कादायक घटना कोझिकोड जिल्ह्यातील एरमला येथे घडली, जिथे सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या इंदिरा गांधी भवन कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. एफआयआरनुसार, सुमारे २०० हल्लेखोर धारदार शस्त्रे घेऊन कार्यालयात घुसले आणि इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचीही नासधूस केली. तब्बल पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंचे समर्थक एकत्र जमल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणली.
मलप्पुरममधील मालाप्पुरम तालुक्यात यूडीएफच्या विजय मिरवणुकीवर दगडफेक झाली, यात अनेक जखमी झाले. वायनाडमधील सुलतान बाथेरी येथे यूडीएफ कार्यकर्ता आणि त्याच्या कुटुंबाच्या कारवर तब्बल ४० सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी हल्ला केला, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथे मुस्लिम लीग कार्यकर्त्यांच्या घरी हल्ले झाले. त्यांच्या घरांची आणि वाहनांची तोडफोड झाली. पोलिसांच्या मते, यूडीएफची विजय मिरवणूक थांबवण्यासाठी काही सीपीआय(एम) कार्यकर्ते तलवारी, कोयते घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी हिंसक चकमकीत अनेकजण जखमी झाले.
कन्नूरमधील उलिक्कल आणि कासारगोड जिल्ह्यातील बेडकोम येथेही यूडीएफ आणि एलडीएफ कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. बेडकोममधील हल्ल्यात पोलिस कर्मचारीही जखमी झाले. तिरुवनंतपुरममधील नेय्याट्टिनकारा येथे सीपीआय(एम) आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली.
निकालांनुसार, सत्ताधारी एलडीएफला मोठा पराभव सहन करावा लागला असून यूडीएफने १२०० पैकी ६४९ स्थानिक संस्था जिंकल्या आहेत. त्यात ५०५ ग्रामपंचायती, ७९ पंचायत समित्या, ७ जिल्हा परिषदां, ५४ नगरपालिका, ४ महानगरपालिका यांचा समावेश आहे.
भाजप-एनडीएने इतिहास रचत तिरुवनंतपुरम महापालिकेतील १०१ पैकी तब्बल ५० जागा जिंकल्या, जे केरळच्या राजकारणातील मोठे वळण मानले जात आहे.
निकालांनंतर उसळलेल्या हिंसाचाराने केरळमध्ये राजकीय तणाव शिगेला पोहोचला असून, सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कडक उपाययोजना कराव्या लागत आहेत.
Left Stung by Defeat, Violence Erupts Across Kerala, Congress Office Vandalised
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप