दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; लवकरच अधिकृत घोषणा होणार, दत्तात्रय धनकवडे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले आहेत.

धनकवडे यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सखोल चर्चा झाली असून, “ताई आणि दादा” यांच्यातही यासंदर्भात संवाद झाला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, “दोन्ही पक्षांतील नेत्यांचे बोलणे झाले आहे. राष्ट्रवादी एकत्र येणारच आहे. यावर आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.”पुण्यातील ३८ प्रभागांबाबत निर्माण झालेला तिढा देखील लवकरच सुटेल, असे धनकवडे यांनी स्पष्ट केले. “प्रसाद जगताप हे शहराध्यक्ष आहेत, शरद पवार आणि अजितदादा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या सर्व पातळीवर चर्चा झालेली आहे,” असे त्यांनी सांगितले.

दोन्ही गट एकत्र आल्यानंतर निवडणूक चिन्हाबाबतही महत्त्वाचे विधान करताना धनकवडे म्हणाले की, “तुतारी पण घड्याळावरच निवडणूक लढवणार आहे,” यामुळे राष्ट्रवादीच्या एकीबाबतचे संकेत अधिक ठोस झाले आहेत.
या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Both NCP Factions to Reunite, Official Announcement Soon, Claims Dattatray Dhankawade

महत्वाच्या बातम्या