महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत

विशेष प्रतिनिधी

पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले असून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्या तरी शिवसेनेने मांडलेल्या जागांच्या मागणीवर भाजपकडून ठोस सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याने महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे.शिंदे गटातील प्रमुख नेते रवींद्र धंगेकर यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. Ravindra Dhangekar

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या चर्चेत धांगेकर यांना सामावून घेण्यात आलेले नाही. भाजपकडून शिवसेनेला दहा किंवा अगदी जास्तीत जास्त पंधरा जागा देण्याची तयारी आहे. जागावाटपात शिवसेनेला दुय्यम आणि निवडणूकदृष्ट्या कमकुवत प्रभाग दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या वादावरून धंगेकर आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी रंगली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. अखेर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला असला तरी, या घटनेनंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धंगेकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे धंगेकर कुटुंबाकडून स्वतंत्र राजकीय पाऊल उचलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर हा प्रभाग क्रमांक २४ मधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतील मतभेद केवळ चर्चेपुरते न राहता थेट निवडणूक रणांगणात दिसण्याची चिन्हे आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर निवडणूक कोणासाठी लढवायची हा प्रश्न आहे. भाजपने शिवसेनेला दिलेला जागावाटपाचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. ज्या जागा ऑफर केल्या आहेत, त्या ठिकाणी आजवर कोणीही निवडून आलेले नाही. अशा जागा स्वीकारून काय साध्य होणार?”

या घडामोडींमुळे पुण्यातील महायुतीचे राजकारण अधिकच तापले असून, आगामी निवडणुकीत कोणती नवी समीकरणे तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ravindra Dhangekar’s displeasure is revealed, he is preparing to contest as an independent.

महत्वाच्या बातम्या