शरद पवार यांचे संसदीय कारकीर्दीच्या 60व्या वर्षात पदार्पण, सुप्रिया सुळे यांची भावनिक पोस्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी (22 फेब्रुवारी) त्यांच्या संसदीय कारकीर्दीच्या 60व्या वर्षी पदार्पण केल्यानिमित्ताने त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचे स्मरण करत जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. Sharad Pawar

“शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकीर्दीचे आज साठावे वर्ष सुरू झाले आहे. गेल्या सहा दशकांत त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत. या काळात त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवला. त्यांचा हा प्रवास आजही पूर्ण जोमाने चालू आहे.” असे म्हणत त्यांनी या निमित्ताने वडिलांच्या या यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्दीचे कौतुक केले आहे.



सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सन 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे.

या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे राहिले. जनतेने आदरणीय त्यांच्यावर अलोट प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकला. या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.” असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले.

शरद पवार यांना रविवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दलची माहिती दिली होती. “आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्ट बाकी आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करत आहोत,” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार, असेही सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडियावर म्हटले.

Sharad Pawar Enters 60th Year of Parliamentary Career; Supriya Sule Shares Emotional Tribute

महत्वाच्या बातम्या