विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिक्षकांना कुत्रे मोजायचं काम देऊन शासनाने एकप्रकारे शिक्षकांचा मोठा अपमान केला आहे, असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे हे शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामावरून विधान परिषदेत आक्रमक झाले.
प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना विक्रम काळे म्हणाले की, आपल्या राज्यामध्ये सातत्याने शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक कामे काढावी आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम ठेवावं, यासाठी वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना आणि अनेक शिक्षक लोकप्रतिनिधींनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मागे झालेल्या राज्यशिक्षक पुरस्कार वितरण समारंभात देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं होतं की, यापुढे शिक्षकांना यापुढे शिकवण्याशिवाय इतर कोणतेही काम लावण्यात येणार नाही. मात्र आता कहरच झाला आहे. शिक्षकांना कुत्रे मोजायचं काम दिलेलं आहे. असे काम देऊन शासनाने एकप्रकारे शिक्षकांचा मोठा अपमान केला आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यामध्ये शिक्षकांना आपण आचार्य मानतो. एकीकडे आपण शिक्षकांना मानाचं स्थान देतो आणि दुसरीकडे आपण त्यांना कुत्रा मोजायचं काम लावतो. त्याचबरोबर इतरही अशैक्षणिक कामे त्यांना लावली जातात. निवडणुका देखील शिक्षक दिसतो. कोणतीही छोटी-मोठी निवडणूक आली तरी शिक्षक दिसतो. मतदार यादी दुरुस्त करायची असेल तरी शिक्षक दिसतो, स्वच्छता गृह मोजायचे असतील तरी शिक्षक दिसतात, सरकारकडे इतक्या यंत्रणा आहेत इतर कर्मचारी आहेत, त्यांना काम नसतं, परंतु त्यांना कामाला लावलं जात नाही, असे म्हणत विक्रम काळे यांनी संताप व्यक्त केला.
काळे म्हणाले की, एका शाळेमध्ये 60 शिक्षक आहेत. त्या शाळेतील 45 शिक्षक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी घेतले होते. 15 शिक्षकांवर त्या शाळेतील दोन हजार मुलं कशी सांभाळायची? एका एका वर्गात 50 ते 60 मुलं असतात, अशावेळी शाळा कशी चालवायची? कलेक्टर यांना याबद्दल सांगितलं, तर ते तुमच्यावर गुन्हा नोंद करू सांगून भीती दाखवतात. एकीकडून आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते, परंतु दुसरीकडे अशैक्षणिक सगळं काम करून शिक्षक जास्त तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो. विद्यार्थी आमचं दैवत आहे, त्यांच्यामुळे शाळा आहे आणि शाळेमुळे आम्ही आहोत. आम्ही हे सगळं कधी विसरत नाही, पण यानिमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे की, मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी, आम्हाला बोलवावं आणि याचा सोक्षमोक्ष लावावा. मंत्र्यांनी फक्त उत्तर देऊन वेळ मारू नये, याचा सोक्षमोक्ष लावावा आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय शिक्षकांना कोणतेही काम लावणार नाही, असं उत्तर मंत्री ठामपणे देतील काय?
विक्रम काळे यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, आम्ही देखील स्वीकारतो की, शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त अनेक अशैक्षणिक कामे देण्यात आलेली आहेत. परंतु 28 -8- 2024 च्या शासन निर्णयानुसार आपण शैक्षणिक कामे कोणती आणि अशैक्षणिक कामे कोणती याचं वर्गीकरण केलेलं आहे. ज्या-ज्या दुसऱ्या विभागाचे अशैक्षणिक कामे आहेत, ते आपण सर्व विभागाला सूचना दिल्या आहेत की, आमचे शिक्षक त्या ठिकाणी ही कामे करणार नाहीत. आपण याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. असं असताना देखील मी माहितीसाठी सांगतो की, बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत कलम 27 अन्वये दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवरणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे शिक्षकांना करणे अनिवार्य आहे आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून बरीचशी कामे त्या ठिकाणी दिलेली आहेत. आपण त्या दोन्ही पोर्टलचं एकत्रिकरण केलं आहे. तसेच आता जे वेगवेगळे दोन ॲप होते, त्यांचं एकत्रिकरण केलं आहे.
पंकज भोयर म्हणाले की, शिक्षकांना कुत्रा मोजण्याचं काम दिलेलं नाही. परंतु आपण पाहतो की, सार्वजनिक ठिकाणी अनेक कुत्रे फिरतात आणि त्यामुळे अनेक घटना घडतात. एक व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ पडले असेल तर त्याची विल्हेवाट लावणे. याच अनुषंगाने आपण आपल्या शैक्षणिक प्रिमायसेसमध्ये व्यवस्थित कुंपण असलं पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडू नये, याची काळजी घेण्याचं काम शिक्षकांनी दिलेलं आहे. शिक्षकांना कुत्रा मोजण्याचं काम कुठहे दिलेले नाही. इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देण्यात आलेली आहेत. परंतु यासाठी शासन गंभीर आहे. शासनाने येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त ही कामे करण्याकरता देता येऊ शकतात का? म्हणजे आठवड्यातला एक दिवस आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षक शिक्षणाचे काम करतील. तसेच गावागावांमध्ये आपले जे सेतू आहेत, सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून हे रिपोर्टिंग त्यांना करता येईल का? असा देखील विचार सुरू आहे.
Teachers are asked to count dogs, MLA Vikram Kale is angry in the legislature
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका