Vikas Gogawale : उच्च न्यायालयाने कान टोचल्यावर विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर

विशेष प्रतिनिधी

महाड : Vikas Gogawale  महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटक न झाल्याबाबत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र असलेले विकास गोगावले (Vikas Gogawale )यांच्यासह इतर आरोपी मोकाट असल्याने न्यायालयाने सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्टपणे नमूद केलं होते.



मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीदरम्यान सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रं सादर केली जातात, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. याच सुनावणीत मुख्यमंत्री आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर झाले.

विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही या आरोपींना अटक होत नव्हती. सरकार वेळकाढूपणा करत आहे का, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.

महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात अचानक तणाव निर्माण झाला होता. विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये आमनेसामने झाल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याचवेळी जाबरे समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचारामुळे मतदानाच्या दिवशी संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

या हाणामारीदरम्यान परिस्थिती आणखी गंभीर बनली. सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तोच रिव्हॉल्व्हर घेऊन विकास गोगावले थेट पोलिस ठाण्यात गेल्याची बाब चर्चेत आली होती. या प्रकारामुळे महाड शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता.

After High Court’s Stern Rebuke, Vikas Gogawale Finally Appears at Mahad Police Station

महत्वाच्या बातम्या