Sahar Sheikh : “मुंब्रा को हरा कर देना है ” वक्तव्यावर सहर शेखचा माफीनामा; पोलिस चौकशीअंती प्रकरण दप्तरी

विशेष प्रतिनिधी

ठाणे : Sahar Sheikh  ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर युनूस शेख (Sahar Sheikh) यांनी केलेल्या “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पूरा हरा कर देना है” या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे तसेच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.



तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख (Sahar Sheikh ) यांना नोटीस बजावून चौकशी केली. चौकशीदरम्यान सहर शेख यांनी संबंधित वक्तव्याबाबत २३ जानेवारी २०२६ रोजी लेखी माफीनामा दिला असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती घेतली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहर शेख यांच्या चौकशीचा सविस्तर अहवाल सोमय्या यांना सादर केला.

माफीनाम्यात सहर शेख यांनी स्पष्ट केले आहे की, सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाचा झेंडा आणि निवडणूक चिन्ह ‘हिरवा’ याच्या संदर्भात होते, त्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा उद्देश नव्हता. “आम्ही तिरंग्यासाठी जगतो आणि तिरंग्यासाठीच मरणार आहोत. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल जाहीर आणि लेखी स्वरूपात माफी मागते,” असे त्यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.
पोलिसांनी माफीनामा स्वीकारताना भविष्यात अशा स्वरूपाचे वक्तव्य झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तजवीज ठेवली असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे.

Sahar Sheikh Apologises Over “Make Mumbra Green” Remark; Case Closed After Police Inquiry

महत्वाच्या बातम्या