विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. Sunetra Pawar
सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. सुनेत्रा पवारयांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले.
त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या तरी, या काळात कोणतेही हार, तुरा किंवा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात साधेपणा आणि संवेदनशीलता जपण्यावर त्यांचा भर असणार आहे.
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) याठिकाणी झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला होता. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली.
State Gets Its First Woman Deputy Chief Minister in the Form of Sunetra Pawar
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ