बीड जिल्ह्यातील वातावरण पुन्हा तापले, वाल्मिक कराडच्या मुलाचा सर्व काही बाेलेल असा इशारा

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याने सर्वांसमोर सर्व काही बोलणार, असा इशारा दिला आहे. हा इशारा नक्की काेणाला याची चर्चा रंगली आहे. Valmik Karad

संताेष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत आली असून सध्या या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी तो बीड जिल्ह्यात येऊन गेल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, आरोपी वाल्मिक कराड याने वारंवार जामिनासाठी अर्ज केले होते; मात्र सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर या प्रकरणात नवे वळण आले आहे. आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने समाजमाध्यमावर एक सूचक संदेश प्रसिद्ध केला आहे. आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार, अशा आशयाची ही नोंद असल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. सुशील नेमके कोणत्या मुद्द्यावर बोलणार, कोणती माहिती उघड करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतरच ही पोस्ट समोर आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही नवे खुलासे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



या प्रकरणासोबतच महादेव मुंडे हत्या प्रकरणाचाही संदर्भ चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणीही तपास सुरू आहे. या प्रकरणात नार्को चाचणीचे अहवाल विशेष तपास पथकाच्या हाती आले आहेत. या अहवालांमधून हत्येचे खरे स्वरूप समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांचा परस्पर संबंध आहे का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.

नार्को चाचणीचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या अहवालात नेमकी कोणती माहिती आहे, आरोपींनी काय कबुली दिली आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास पथकाच्या मते, या अहवालातून गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते, याची उत्सुकता वाढली आहे. विशेषतः महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपशील उघड झाल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी चित्रावर मोठा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेच्या अटकेबाबतही चर्चा सुरू आहे. तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप झाल्यानंतर तपास यंत्रणांनी हालचाली वाढवल्याचे सांगितले जात आहे. आरोपींच्या जामिनाबाबत न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यामुळे पीडित कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र खटल्याचा अंतिम निकाल येईपर्यंत अनिश्चितता कायम आहे.

एकीकडे न्यायालयीन लढा, दुसरीकडे समाजमाध्यमावरील सूचक नोंद आणि तिसरीकडे नार्को चाचणीचा अहवाल या सर्व घडामोडींमुळे बीड जिल्ह्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. वाल्मिक कराडच्या मुलाच्या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसांत नवीन माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The atmosphere in Beed district heated up again, Valmik Karad’s son warned that everything will be revealed

महत्वाच्या बातम्या