नागपूरजवळ दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन 17 कामगार ठार

विशेष प्रतिनिधी

नागपूर: नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले. अनेक जण जखमी झाले असून जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. Ammunition Manufacturing Factory

राऊळगाव लगतच्या येनवरा गावात एसबीएल एनर्जीचा प्रकल्प आहे. या ठिकाणी डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्सप्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास अचानक स्फोट झाला.

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याची पुष्टी केली आहे. जखमींची नेमकी माहिती हाती यायची आहे. ही घटना घडली तेव्हा एसबीएलच्या विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कर्मचारी काम करत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस, स्थानिक प्रशासन व कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे

कळमेश्वर येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड ही एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. सकाळी कामगार कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला.

भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जखमी कामगारांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा सुरू आहे. घटनेमुळे काटोल तालुका हादरला असून स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

17 Workers Killed in Explosion at Ammunition Manufacturing Factory Near Nagpur

महत्वाच्या बातम्या