प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान, भाजप महिला नेत्याच्या मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात

विशेष प्रतिनिधी

बदलापूर : प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शनिवारी बदलापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने हे विधान केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपने संबंधित महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असून, पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Social Media Post on Lord Ram

भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक ‘रील’ शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये तिने प्रभू श्रीरामांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच बदलापूरमधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शनिवारी सकाळपासूनच खरवई परिसरातील दुकाने आणि रिक्षा संघटनांनी कडकडीत बंद पाळून आपला निषेध नोंदवला.

मृणाल जाधवची आई प्रतिभा जाधव यांचा पक्षाने पदाचा राजीनामा घेतला असून त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. अशा कृत्याला माफी नाही, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला.

या प्रकरणावर मृणालचे वडील महेश जाधव आणि आई प्रतिभा जाधव यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आम्ही हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे करतो, घरात नियमित पूजा-अर्चा असते, असे सांगत त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी मृणाल जाधवला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

BJP Woman Leader’s Daughter Detained Over Objectionable Social Media Post on Lord Ram

महत्वाच्या बातम्या