Raj Thackeray : मनसेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांची सदस्य नोंदणी मोहिमेची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन ९ मार्च २०२६ रोजी साजरा होत असून, या निमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विशेष संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी १० मार्चपासून राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.Raj Thackeray

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले की, ९ मार्च रोजी ते रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर या सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करतील. रायगड हा शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असल्याने अशा ऐतिहासिक आणि पवित्र स्थळावरून मोहिमेला सुरुवात केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.Raj Thackeray



राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करताना सांगितले की, ही सदस्य नोंदणी मोहीम केवळ पक्ष कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्र घडविण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या चळवळीत सहभागी करून घ्यावे. सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी असलेल्या नागरिकांनाही नवनिर्माणाच्या विचारांशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ पक्ष शाखांबाहेर स्टॉल लावण्यापुरते मर्यादित न राहता बाजारपेठा, शाळा, मंदिरे, महाविद्यालये, मैदाने आणि बागा अशा गर्दीच्या ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उभारण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडण्याचेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेत फक्त आकड्यांपेक्षा मराठी माणसाच्या भावना आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची तयारी महत्त्वाची असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल नागरिकांच्या मनात किती नाराजी आहे, हे या मोहिमेतून स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, १९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray Announces MNS Membership Drive from March 10 on Party’s 20th Anniversary

महत्वाच्या बातम्या