Shambhuraj Desai : पहिल्या मजल्यावरील झोपड्यांना नाही मिळणार कोणताही लाभ, शंभुराजे देसाईंची विधानसभेत माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  Shambhuraj Desai  उपनगरामध्ये केवळ तळमजल्यावरील झोपड्यांनाच पुनर्विकासाचा लाभ देण्याची कायद्यात तरतूद असल्याने पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील तसेच पोटमाळ्यावरील झोपड्यांचा पुनर्विकासात समावेश करता येणार नसल्याचा निर्वाळा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज गुरूवारी 12 मार्च रोज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. मात्र, याने झोपडपट्टी मुक्त शहराचा उद्देशच सफल होणार नसल्याचे सांगत मार्ग काढण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.Shambhuraj Desai

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी गुरुवारी विधानसभेत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना पात्र ठरविण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी राज्यातील झोपडपट्टी क्षेत्र सुधारण्याच्या संदर्भातील अधिनियमातील तरतुदी स्पष्ट केल्या. जमिनीला जोडलेले असे बांधकाम, याची स्पष्ट व्याख्या करण्यात आलेली आहे. त्या व्याख्येनुसार जमिनीशी प्रत्यक्ष जोडलेली झोपडी किंवा बांधकामच पुनर्विकासाबाबत ग्राह्य धरले जाते. एखाद्या पात्र झोपडीवर नंतरच्या काळात आणखी एक मजला उभारला जातो. त्यानंतर त्या मजल्यावर नातेवाईक, इतर व्यक्ती किंवा भाडेकरू राहू लागतात आणि नंतर त्यांच्या नावाने स्वतंत्र नोंदी करण्याची मागणी होते.Shambhuraj Desai



मात्र, संपूर्ण कायदा पाहिल्यास केवळ जमिनीला प्रत्यक्ष जोडलेल्या झोपडीचाच त्या संदर्भात समावेश करण्याची स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे आपण जसे सर्वेक्षण किंवा नंबरिंग करण्याबाबत म्हणता तसे कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन अशा प्रकारे नोंदी करणे शक्य नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील झोपड्यांचाही पुनर्विकासात समावेश करण्याची मागणी अन्य सदस्यांनी केली. तर, झोपडपट्टी मुक्त शहराचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. त्यावर, या संदर्भात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडावी लागेल आणि त्या बैठकीत ते जे निर्देश देतील त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

No Benefits For First Floor Slum Structures, Says Shambhuraj Desai In Assembly

महत्वाच्या बातम्या