महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती. पहिल्या 35 देशांचा विचार केला तर आपण ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाइन्स, व्हियतनाम, बांगलादेश या देशांना मागे टाकले आहे. या सर्व देशांहून आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आपण आपला ग्रोथ रेट कायम ठेवला, तर पुढील 2-3 वर्षांत यूएई व सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही आपण मागे टाकू. आपला विस्तार या देशांहून अधिक मोठा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसम्हणाले, कर्जाची आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केली तर महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगल्या स्थिती आहे. मोठ्या राज्याच्या तुलनेत तर निश्चितपणे आपण चांगल्या स्थितीत आहोत. इतर राज्य 36 टक्क्यांवर पोहोचलेत. पण केवळ 18 टक्क्यांवर आहोत. आपली कर्ज घेण्याची क्षमता अजून भरपूर आहे. कर्ज वाढत आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणे गरजेचे आहे.

तेलंगणाचे दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त असल्याचा विरोधकांनी दावा केला. हे खरे आहे. पण त्यांच्याकडे हैदराबाद आहे. त्यांचाही राजकोषीय तूट साडेतीन टक्क्यांवर आहे. महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, हे सगळे करून राजकोषीय तूट 2.78 टक्क्यांवर आहे. आपण महसुली तुटीचा विचार केला तर ती ही 1 टक्क्यांच्या आत आहे. हे सरकारचे यश आहे. 2019-20 साली आपली महसुली तूट 41 हजार कोटी होती. ती आता आपण 40 हजार कोटींवर आणली आहे. राज्यात महसुली जमा 2013-14 साली 1 लाख 55 हजार कोटी रुपये होती. ती आता 6 लाख 16 लाख कोटींवर पोहोचली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, अनेकांना प्रश्न पडतो की, हे 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन हे शक्य आहे का? पण आपण आता 660 बिलियनवर (डॉलर्स) पोहोचलोत. 340 बिलियन अजून आपल्याला हवेत. आता मागच्याच वर्षाचा विचार केला, तर मागच्या एका वर्षात आपण जवळपास 55 बिलियन अॅड केलेत. त्यामुळे हाच रेशो राहिला तर केवळ 5-6 वर्षे लागतील. आपल्याला 1 हजार बिलियनवर जायचे आहे. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत डॉलरची किंमत सारखी बदलत असते. स्थिर किंमतीचा विचार केला तर 2029 मध्येच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होऊ. पण आताचा विचार केला तर कदाचित एखाद दुसरे वर्ष मागेपुढे होईल, असे ते म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी यावेळी निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा विरोधकांचाही आरोप फेटाळून लावला. ते या प्रकरणी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना फटकारत म्हणाले, जयंत पाटलांनी सिलेक्टिव्ह आकडेवारी जाहीर केली. त्यांनी 59 टक्के निधीला भाजपला, 22 टक्के शिवसेनेला, 19 टक्के राष्ट्रवादीला दिल्याचा दावा केला. पण 2022 मध्ये काय झाले होते. 2022 मध्ये तुमच्याकडे सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेला केवळ 16 टक्के निधी देण्यात आला होता.

याऊलट काँग्रेसला 26 टक्के व तेव्हाच्या राष्ट्रवादीला तब्ल 57 टक्के मिळाले होते. आम्ही तर 137 आमदार आहोत. तुम्ही किती होतात केवळ 54. आरोप झालेच पाहिजे. पण कुणाकडे कोणती खाती आहे या आधारावरही अनेकदा निधी मिळतो. उदाहरणार्थ नगरविकास खात्यात एमएमआरडीएला जवळपास 1 लाख कोटींची कामे करत आहोत. ही कामे बजेटमध्ये दिसत नाही. सिडकोचीही कामे बजेटमध्ये दिसत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

If Maharashtra Were a Separate Nation, It Would Rank 30th in Global Economy: CM

महत्वाच्या बातम्या