विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramesh Mhatre डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शासकीय कर्तव्यावर असताना बेदम मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १४ जुलै रोजी मंजूर केलेला जामीन हायकोर्टाने तडकाफडकी स्थगित केला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या गंभीर प्रकरणाची स्वतःहून सुओ मोटो दखल घेत आज, शनिवारी घेतलेल्या विशेष सुनावणीत हा अंतरिम आदेश जारी केला.Ramesh Mhatre
मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून त्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी उद्या, रविवार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जर म्हात्रे दिलेल्या मुदतीत विष्णूनगर पोलिसांना शरण आले नाहीत, तर त्यांच्या सर्व स्थावर मालमत्तांवर टाच आणण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. या सुनावणी दरम्यान रमेश म्हात्रे यांच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत तब्बल १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक नोंदही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात घेतली आहे.Ramesh Mhatre
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरसह दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह राज्य सरकारवर चौफेर टीका झाली होती.
याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरुवातीला अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद ऊर्फ प्रकाश निकम या तीन सह-आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मुख्य आरोपी म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत होता. सर्व बाजूंनी वाढलेल्या दबावानंतर म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर म्हात्रे यांना तुरुंगात पाठवण्याऐवजी वैद्यकीय कारणांचा आडोसा घेत थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान अत्यंत नाट्यमय घडामोडीत त्यांना कल्याण कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला. कनिष्ठ न्यायालयाच्या याच संशयास्पद जामीन प्रक्रियेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने आगामी सोमवारपासून राज्यातील सर्व वैद्यकीय आणि आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवून तीव्र संप पुकारण्याची घोषणा केली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रस्तावित संपाचीही गंभीर दखल घेतली. न्यायालयाने आरोपीविरुद्ध कडक पावले उचलल्याचे स्पष्ट करत, सामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा आणि कामावर परत यावे, असे भावनिक आवाहन केले आहे.
Kalyan Doctor Assault Case: Bombay HC Stays Ramesh Mhatre’s Bail, Orders Him to Surrender by Tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका