गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी

 

कोल्हापूर: सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सुमारे 1200 सभासदांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचला महत्त्वाचे निर्देश दिल्याची माहिती गोकुळचे वकील पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील प्रतिवादी प्रकाश बेलवाडे यांनी ही माहिती फेटाळत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारली असल्याचा दावा केला आहे.

गोकुळमधील 1200 सभासदांच्या पात्रतेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंचला संबंधित सभासदांचे म्हणणे ऐकून प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्याचे निर्देश दिल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे 17 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत या सभासदांच्या पात्रतेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



या प्रकरणात आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढलेल्या परिपत्रकाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना मंत्री मुश्रीफ यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गोकुळ प्रशासनाकडून मंत्री मुश्रीफ यांनी काढलेले परिपत्रक आणि 1200 सभासदांच्या नोंदणीसंबंधीची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. या प्रकरणात केवळ परिपत्रकाच्या आधारे सुनावणी सुरू असली तरी संबंधित सभासदांचे म्हणणे ऐकणे आवश्यक असल्याचे गोकुळ प्रशासनाने न्यायालयात नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचला “या 1200 सभासदांचे म्हणणे ऐकून घ्या आणि प्रकरणाचा तातडीने निर्णय द्या” असे निर्देश दिल्याचे गोकुळचे विधी सल्लागार पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

मात्र या प्रकरणातील प्रतिवादी प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळकडून देण्यात आलेली माहिती नाकारत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील वास्तविक स्थिती आणि सभासदांच्या पात्रतेबाबतचा अंतिम निर्णय आगामी सुनावणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Supreme Court Issues Directions to Kolhapur Circuit Bench in Gokul Membership Dispute

महत्वाच्या बातम्या