आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक

विशेष प्रतिनिधी

पुणे : मध्यपूर्वेत सध्या सुरू असलेल्या इराण-इस्राईल-अमेरिका संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या देशातील आयात-निर्यात व्यवहारांवर निर्बंध आणल्यामुळे जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्याचाच फटका आता भारतातील एलपीजी (LPG) गॅस पुरवठ्यावर बसू लागला असून अनेक शहरांमध्ये कमर्शियल गॅसची टंचाई जाणवत आहे.



या परिस्थितीचा परिणाम पुणे शहरातही स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः हॉटेल व्यवसाय, मेस आणि वसतिगृहांना याचा मोठा फटका बसत आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील स्वामिनी वस्तीगृहात सध्या सुमारे २५० मुली वास्तव्यास आहेत. या वस्तीगृहात राहणाऱ्या मुलींच्या सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था वस्तीगृह प्रशासनाकडूनच केली जाते. मात्र कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वस्तीगृह प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाकाची व्यवस्था बिघडली आहे. परिणामी वस्तीगृह प्रशासनाला पर्याय म्हणून पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. मोठ्या प्रमाणावर मुलींच्या जेवणाची व्यवस्था करणे ही आधीच मोठी जबाबदारी असताना चुलीवर स्वयंपाक करणे हे अत्यंत कष्टाचे काम ठरत आहे.

स्वयंपाकघरात सकाळपासूनच धुराच्या वातावरणात स्वयंपाक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही मुलींना वेळेवर जेवण मिळावे यासाठी वस्तीगृह प्रशासन आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गॅस टंचाईमुळे पुण्यातील अनेक हॉटेल्स, मेस आणि लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांनाही मोठा फटका बसत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यास पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वस्तीगृहात राहणाऱ्या मुलींनीही या परिस्थितीची जाणीव ठेवत प्रशासनाला सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. मात्र लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा वस्तीगृह प्रशासन आणि विद्यार्थिनींकडून व्यक्त केली जात आहे.

The impact of international war reaches the city’s hostels; Cooking on stoves due to gas shortage

महत्वाच्या बातम्या