चाकणकरांचा पाय आणखी खोलात; महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही उचलबांगडी होण्याची शक्यता ?

विशेष प्रतिनिधी

पुणे: नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही गदा येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. खरात प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना ज्येष्ठ नेत्यांमध्ये असून, लवकरच त्याच्या उचलबांगडीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. Rupali Chakankar

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबत रूपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना अशा प्रकारच्या वादात नाव आल्याने चाकणकर यांची नैतिक कोंडी झाली होती. आता हे प्रकरण त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ घालणारे ठरण्याची शक्यता आहे. Rupali Chakankar

पक्ष बैठकीत हालचालींना वेग

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. आगामी निवडणुका आणि पक्षाची प्रतिमा लक्षात घेता, वादग्रस्त नेत्यांना पदावरून दूर ठेवण्याचा सूर काही वरिष्ठ नेत्यांनी लावला आहे. “पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कठोर निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अडचणींचा डोंगर वाढणार?

अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांचा सहभाग नेमका किती खोलवर आहे, याबाबत नवनवीन माहिती समोर येत असल्याने त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला आयोगाचे पद गेल्यानंतर आता पक्षांतर्गत पदही जाण्याच्या भीतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चाकणकर यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय आता पक्षश्रेष्ठींच्या हाती असून, येत्या काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Rupali Chakankar Likely to be Ousted from Women’s State President Post?

महत्वाच्या बातम्या