विशेष प्रतिनिधी
पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट २०२६’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुणे आणि अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयने आज सकाळी याप्रकरणी अहिल्यानगर येथे छापेमारी केली. त्यात त्यांनी धनंजय लोखंडे या आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातून पसार झालेला लोखंडे अहिल्यानगरमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचबराेबर मनिषा वाघमारे या महिलेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिस तपासात धनंजय लोखंडेचे शेवटचे लोकेशन पुण्यात दिसून आले होते. मात्र, पोलिसांच्या छाप्याची कुणकुण लागताच त्याने तिथून पळ काढला आणि तो अहिल्यानगरमध्ये आश्रयाला आला. विशेष तपास पथक आणि स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या लोखंडेची कसून चौकशी सुरू असून, या पेपरफुटीच्या रॅकेटचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, याचा छडा लावला जात आहे. लवकरच त्याला संबंधित मुख्य तपास यंत्रणेच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी देखील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. मनिषा वाघमारे असे या महिलेचे नाव असून, तिचे फोन, लॅपटॉप आणि अन्य तांत्रिक उपकरणे सीझ केली आहेत. मनिषा ही अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलेल्या धनंजय लोखंडे याच्याशी सतत संपर्कात होती, अशी बाब समोर आली आहे. मनिषा आणि धनंजय यांच्यात झालेले व्हाॅटसअप चॅट्स आणि कॉल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी संशयित असलेला शुभम खैरनार याला दोन दिवसांची ‘ट्रान्झिट रिमांड’ (हस्तांतरण कोठडी) मंजूर करण्यात आली आहे. मुंबईतील किल्ला न्यायालयाने सीबीआयला खैरनारला तपासासाठी दिल्लीला नेण्याची परवानगी दिली आहे. उद्या, १४ मे रोजी त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी खैरनारची कोठडी आवश्यक असल्याचे ले आहे. शुभम खैरनारला काल नाशिक पोलिसांनी अटक केली होती.
३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा आधीच रद्द केली आहे. परीक्षेच्या एक महिना आधीच राजस्थानमधील सिकर सारख्या कोचिंग हबमध्ये हा पेपर पोहोचला होता. परीक्षेच्या आदल्या रात्री हा पेपर ७ लाख ३० हजार रुपयांना विद्यार्थ्यांना विकला गेल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, एका कथित ‘गेस पेपर’मधील रसायनशास्त्राचे (Chemistry) १२० प्रश्न आणि जीवशास्त्राचे (Biology) अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जसेच्या तसे जुळले होते.
या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांपर्यंत विस्तारला आहे. जयपूरमधून या प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ मनिष यादव याला आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नाशिकमधून संशयित डॉ. शुभम मधुकर खैरनार यांस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. धनंजय लोखंडे हा शुभम खैरनार या तरुणाचा मित्र असल्याची माहिती आहे.
Woman arrested from Pune in NEET exam paper leak case
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी