तर इम्तियाज जलील यांचे घरही पाडले जाईल, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील एआएमआयचे नगरसेवक मतीन पटेल प्रमाणेच माजी खासदार इम्तियाज जलील यांचे घरही अनधिकृत आहे का? याची चौकशी मी लावणार आहे. नकाशा आणि परवानगीनुसार बांधकाम नसेल तर जलील यांचेही घर पाडले जाईल, असा इशारा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे.
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील अनेक दिवस फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला 7 मे रोजी अटक करण्यात आली. निदा खान फरार झाल्यानंतर मतीन पटेल यांच्या घरात कुटुंबासोबत राहात होती. त्यामुळे टीसीएस प्रकरणाचे संबध थेट एआएमआय पक्षाशी जोडले गेले.

पत्रकार परिषदेत मतीन पटेल यांच्या घरावरील कारवाईवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, मतीन पटेल यांचे घर आणि दुकान पूर्णपणे अनधिकृत होते. प्रशासनाने त्यांना आधीच नोटीस बजावली होती. त्याविरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते, मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे कायद्यानुसारच जमीनदोस्त करण्याची कारवाई झाली आहे. मात्र, इम्तियाज जलील यांनी रात्री 12 वाजता मतीन पटेल यांची भेट घेऊन त्यांना काळजी करू नका आणि पुन्हा घर बांधून देऊ, असे आश्वासन दिले आहेत. असे करून आरोपींचे उघड समर्थन आहे. त्यामुळे आता जलील यांच्या मालमत्तेच्या चौकशीचे आदेश मी देणार आहे. तसेच मतीनप्रमाणेच इम्तियाज जलील यांचे घरही अनधिकृत आहे का? याची चौकशी मी लावणार आहे. नकाशा आणि परवानगीनुसार बांधकाम नसेल तर जलील यांचेही घर पाडले जाईल. केवळ विरोधकच नव्हे, तर माझ्या पक्षाचा नगरसेवक जरी असला आणि त्याचे बांधकाम अनधिकृत असेल, तरी आम्ही ते पाडणार आहोत. अनधिकृत बांधकामाला सरकारचा कोणताही पाठिंबा नाही.



शिरसाट म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राचे पोलीस ज्या निदा खानचा शोध घेत होते, तिला मुंब्र्याहून संभाजीनगरमध्ये आणणारे आणि मतीन पटेलच्या घरात 35 दिवस लपवून ठेवणारे दुसरे तिसरे कोणी नसून इम्तियाज जलील हेच आहेत. इम्तियाज जलील हे खऱ्या अर्थाने ‘अर्बन टेररिस्ट’ आहेत. जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावे की, त्यांनी निदाला आणले नाही? कारण त्या बिचाऱ्या नगरसेवकाचा यात काहीच रोल नाही. त्याला जलील यांनीच यात ओढले आहे. तसेच या भागात लव्ह जिहाद आणि हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याचे कारस्थान रचले जात आहे. या सर्वांचा म्होरक्या इम्तियाज जलील हेच आहेत. ते शहरात विषाचे बी पेरत असून निजामाची मानसिकता जोपासत आहेत. जलील आम्हाला घटना आणि कायदा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते स्वतः मुख्य आरोपी आहेत. मतीन पटेलने दिलेल्या जबाबावरून जलील यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी सरकार म्हणून आम्ही पोलिसांच्या तपासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास केला जाईल.

Imtiaz Jaleel’s house will also be demolished, warns Social Justice Minister Sanjay Shirsat

महत्वाच्या बातम्या