Sharad Pawar : इंधन बचतीत दिखावा नको, सातत्य हवे, शरद पवार यांची अपेक्षा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sharad Pawar  इंधन बचतीच्या मुद्द्यावर केवळ प्रतीकात्मक कृती करून उपयोग नाही, तर त्यात सातत्य आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची गंभीरता लक्षात घेणे आवश्यक असले, तरी त्यानंतर काही नेत्यांकडून होत असलेले प्रयत्न हा केवळ दिखावा असल्याची टीका त्यांनी केली.Sharad Pawar

पुण्यात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी इंधन बचतीसंदर्भातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले. सकाळपासून माध्यमांमध्ये काही नेते मोटारसायकलवरून किंवा पायी कार्यालयात जात असल्याचे दिसत असल्याचा उल्लेख करत त्यांनी या कृतींवर उपरोधिक टीका केली. काही मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्यांची संख्या १७ वरून ८ पर्यंत कमी केल्याचे सांगितले जात असताना, पूर्वी एवढ्या गाड्या का होत्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्वतःच्या ताफ्याचा दाखला देताना, गेल्या चार वर्षांपासून केवळ तीन गाड्यांमध्येच आपला ताफा मर्यादित असल्याचे त्यांनी नमूद केले.Sharad Pawar



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटारसायकलवरून मंत्रालयात जाण्याच्या कृतीवर भाष्य करताना, हे पाऊल सातत्याने राबवले गेले तरच लोक त्याकडे गांभीर्याने पाहतील, असे पवार म्हणाले. तसेच इंधन बचतीचा विचार निवडणुकीदरम्यान का पुढे आला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याकडे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः इराणसंबंधित परिस्थितीचा परिणाम होत असला, तरी त्यामागील इतर कारणांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच निर्णय घेतले जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला.

जागतिक तेलसंकट आणि देशातील आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वदलीय बैठक बोलवावी, अशी मागणीही पवार यांनी केली. या बैठकीत पंतप्रधान स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांत झालेल्या सर्वदलीय बैठकींना पंतप्रधान उपस्थित नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरही पवार यांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीविषयी बोलताना संयम राखणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना, अशा घटना पूर्वीही घडल्या असून आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे पुन्हा पेपरफुटी झाल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar calls for consistency, not tokenism, in fuel-saving efforts

महत्वाच्या बातम्या