विशेष प्रतिनिधी
पुणे / नवी दिल्ली: NEET paper leak देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. या प्रकरणातील ही आठवी अटक असून, कुलकर्णी हेच संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.NEET paper leak
तपास यंत्रणेनुसार, कुलकर्णी हे मूळचे लातूरचे रहिवासी असून अनेक वर्षांपासून NEET प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञ पॅनेलचा भाग होते. त्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिकेपर्यंत थेट प्रवेश होता. CBI च्या मते, या विश्वासाचा गैरवापर करून त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच निवडक विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे पुरवली.NEET paper leak
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुलकर्णी पुण्यात त्यांच्या घरातून खासगी कोचिंग क्लास चालवत होते. याच ठिकाणी विद्यार्थ्यांना “महत्त्वाचे प्रश्न” म्हणून लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न शिकवले जात होते. आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्यात आल्याचा आरोप आहे.
टेलिग्राम ग्रुपवर १ मे रोजीच पेपर?
CBI च्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. NEET 2026 ची प्रश्नपत्रिका १ मे रोजीच ‘Private Mafia’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आल्याचा संशय आहे. यासंबंधीचा व्हिडिओ आणि PDF फाइल तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
लीक झालेल्या PDF मध्ये ‘सेट नंबर 12’ असल्याचे दिसून आले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी मूळ NEET प्रश्नपत्रिकेच्या सेट-12 शी तुलना केली असता अनेक प्रश्न अक्षरशः जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेषतः प्रश्न क्रमांक ५ मध्ये उभ्या दिशेने फेकलेल्या चेंडूचा वेग आणि वेळ यासंबंधी विचारलेला भौतिकशास्त्राचा प्रश्न, त्यातील आकृतीसह पूर्णपणे जुळत असल्याचे समोर आले आहे. त्याच पानावरील इतर अनेक प्रश्नही समान असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
देशभरात संताप; तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या
या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीतील २० वर्षीय तरुणीने, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील २१ वर्षीय युवकाने आणि गोव्यातील १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांनंतर NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा रद्द करण्याची आणि संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोचिंग माफिया, इनसाइडर नेटवर्क आणि पैशांचा खेळ?
CBI आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कोचिंग क्लासेसचे नेटवर्क आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमधील इतर सदस्यांची भूमिका तपासत आहे. तपास यंत्रणांच्या मते, हा केवळ पेपरफुटीचा मामला नसून “इनसाइडर नेटवर्क” आणि कोचिंग माफियाच्या संगनमताचा मोठा घोटाळा असू शकतो.
दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि शिक्षण मंत्रालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विरोधकांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्याचा आरोप केला आहे.
Pune link to NEET paper leak exposed; chemistry professor arrested, CBI claims he is the mastermind
महत्वाच्या बातम्या