विशेष प्रतिनिधी
जळगाव : Eknath Khadse राज्यातील काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे, विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातून चार मंत्री मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करत असतानाही, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही मंत्र्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.Eknath Khadse
खडसे म्हणाले की, जिल्ह्यातील मंत्र्यांना विधान परिषदेच्या निवडणुकांतील राजकारणात अधिक रस असून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. “शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्याही शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र जिल्ह्यातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून काढणीसाठी तयार असलेला मालही वाऱ्यामुळे आणि पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.Eknath Khadse
सलग तीन दिवसांच्या वादळी पावसाने मोठे नुकसान
\सलग तीन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, जळगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांतील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः रावेर तालुक्यातील निरुळ, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रूक, अटवाडे, खिर्डी, ऐनपूर आणि रसलपूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील तापीकाठच्या परिसरातील बागांनाही मोठा फटका बसला आहे.
याशिवाय जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द आणि आव्हाणे, चोपडा तालुक्यातील गोरगावले, माचले, मंगरूळ, वर्डी, खर्डी, पंचक आणि धानोरा तसेच यावल तालुक्यातील किनगाव, मनवेल, न्हावी आणि थोरगव्हाण या भागांतील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पाच तालुक्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत व भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी संघटनांनीही शासनाने त्वरित मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे.
Ministers busy with politics, ignoring distressed farmers: Eknath Khadse slams Maharashtra government over banana crop losses
महत्वाच्या बातम्या